मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आक्रमक होत आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी ‘सिल्वर ओक’च्या आवारात घुसून चप्पल व दगड भिरकावले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याने तसेच एसटी महामंडळाच्या विलीनीकरण न होण्याला सर्वस्वी शरद पवार जबाबदार असल्याचे आरोप करत आंदोलकांनी हा हल्ला केला आहे.
यावेळी, खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात शिरून सर्व कर्मचाऱ्यांशी बोलण्याची तयारी आहे. मात्र, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. त्या कर्मचाऱ्यांना म्हणाल्या, “माझी आई आणि मुलगी घरात आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्या सुरक्षिततेची सोय करून मी पुन्हा तुमच्याशी संवाद साधायला तयार आहे.
एसटीच्या विलीनीकरणावर अद्याप काही कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं त्यांनी म्हटलं असून शरद पवार यांनी विलीनीकरणासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकरण न होण्यामागचे सूत्रधार असल्याचं सांगून मविआ सरकारने १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.
बुधवारी उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना, आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले.