डॉक्टर तयार आहेत …पंचवीस हजार खर्च येईल..!

कोल्हापुरातील बेकायदा गर्भपात रॅकेटचे ‘अंनिस’कडून स्टिंग ऑपरेशन

    

कोल्हापूर : कोल्हापुरातील बोगस डॉक्टरांनी चालवलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा नुकताच पर्दाफाश करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील हर्शल नाईक आणि उमेश पोवार हे बोगस डॉक्टर आणि त्यांचे दोन एजंट यांनी हे रॅकेट चालवले होते. पोलिसांनी या बोगस डॉक्टरांना अटक केली आहे. यासाठी ‘अंनिस’ (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)च्या पथकाने स्टिंग ऑपरेशन केले होते.    

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, पडळ गावात बोगस डॉक्टर बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात करत असल्याची महिती ‘अंनिस’ला मिळाली. त्यानुसार एक सापळा रचून पीडित गर्भवती महिला म्हणून कॉन्स्टेबल, तिचा पती म्हणून सीपीआरचे आरोग्य विस्तार अधिकारी आणि मुलीची मावशी म्हणून समाजसेविका गीता हासूरकर यांची टीम बनवण्यात आली होती. प्राथमिक चौकशी करण्यासाठी ‘अंनिस’ची स्टिंग ऑपरेशनसाठीची ही टीम डॉक्टरांकडे मंगळवार, दि. 5 एप्रिल रोजी तपासणीसाठी गेली. पीडितेला चार वर्षांची मुलगी असून दुसर्‍या वेळी गोळी घेऊन गर्भपात झाल्याची खोटी बतावणी करून आताही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात करायचा आहे, असे सांगण्यात आले. एजंटसह डॉ. नाईक यांची खात्री पटल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी गीता हासूरकर यांना एजंटचा फोन आला, ‘डॉक्टर तयार आहेत.. 25 हजार खर्च येईल. तुमच्या भाचीला पडळ गावच्या कमानीजवळ घेऊन या,’  त्यानंतर या टीममधील तिघेजण रात्री 8 वाजता पडळच्या नियोजित ठिकाणी रिक्षातून पोहोचले.

एजंटने एका क्लिनिकच्या वरच्या मजल्यावर त्यांना नेले. तिथे आधीपासूनच डॉ. हर्षल नाईक वाट पाहत होते. पुन्हा रिक्षातूनच या तिघांसोबत डॉक्टरही कोल्हापूरमधील अंबाई टँक परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास गेले. दरम्यान, डॉ. नाईक यांनी गर्भपात करणारे डॉ. उमेश पोवार यांना तिथे येण्यास सांगितले होते. रंकाळा परिसरात आल्यानंतर डॉ. पोवार यांनी रुग्ण आणि नातेवाईकांची चौकशी करून प्राथमिक स्वरूपात पाच हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. घरी नेऊन पीडितेला गोळ्या दिल्या व 48 तासांनंतर पिशवीचे तोंड उघडेल, तेव्हा माझ्याकडे यायचे, असे सांगितले. याचवेळी पोलिसांनी छापा टाकला आणि डॉ. पोवार यांच्या घरी मिळालेल्या  गर्भपाताच्या गोळ्या, इंजेक्शन, सलाईन, गर्भपाताचे किट तसेच गर्भपातासाठी रूग्णांकडून घेतलेली रक्कम जप्त केली. हे स्टींग ऑपरेशन जवळजवळ चार तास चालले होते.