कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मोफत शिलाई मशिन योजना, महिला सक्षमीकरण कार्यक्रम यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या सात वर्षात खर्या अर्थाने नारी शक्तीचा विकास केला. कोल्हापूर जिल्हयात महिला सक्षमीकरणाची चळवळ भक्कम करण्यासाठी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना विजयी करा, असे आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी केले.
जुना बुधवार पेठेत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अनुराधा येडके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला, बुधवार पेठ आणि शनिवार पेठेतील महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीतील भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्या विजयात, महिलांचा मोठा वाटा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची आहे. राज्यातील यापूर्वीच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकीतही भाजपने निर्विवाद विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानोन ताठ होईल, असे पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि सर्वांगीण विकासाच्या योजना यामुळे भाजप सर्वात लोकप्रिय पक्ष बनला आहे. भारतीय जनता पक्षाच्या १५ महिला विधानसभेत आमदार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे भाजपच महिलांना सन्मान आणि संधी देतो, हे सिध्द झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १५ वर्षात भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे अनेक उपक्रम राबवले. आता केंद्रातील भाजप सरकारच्या महिलांसाठीच्या योजना प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचावी, यासाठी काम करणार असल्याचे सौ. महाडिक यांनी सांगितले.
यावेळी वर्षा ढाले, पवित्रा देसाई, संगीता खाडे, शिवानी पाटील, संदीप देसाई, रमेश दिवेकर, धिरज मुळे, राकेश घाटगे, प्रविण चौगले, अमर बोडके, उदयबाबा भोसले, सुनिल पाटील, रोहीत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
