राक्षसी महत्वाकांक्षेतून पालकमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण : चित्रा वाघ

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्हयातच महिलांच्या अत्याचारात वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. सगळया सत्ता मलाच मिळाल्या पाहिजेत, या राक्षसी महत्वाकांक्षेतून त्यांचे नेहमी सुडाचे आणि सोयीचे राजकारण सुरू असते. आधी गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष दयावे आणि  महिला विकासावर भर दयावा, असा चिमटा आज भाजप प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढला.

कोल्हापुरातील शिवाजी पार्क इथल्या नानासाहेब गद्रे उद्यानात मॉर्निंग वॉकर्सशी संवाद साधताना, वाघ यांनी टोला लगावला. केवळ कोल्हापूर उत्तरच्याच नव्हे, तर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांना विजयी करणे गरजेचे आहे, असेही वाघ यांनी नमुद केले. रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणात चित्रा वाघ यांनी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूंधती महाडिक यांच्यासह नागरिकांशी बातचित केली. गेल्या सव्वा वर्षात कोल्हापूर जिल्हयात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्हयातच महिलांवरील अत्याचार वाढणे ही लाजीरवाणी बाब असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत विरोधकांकडून जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा होत नसल्याचे अरूंधती महाडिक यांनी नमुद केले. हद्दवाढ, आयटीपार्क, पंचगंगा आणि रंकाळा प्रदूषण, थेट पाईपलाईन योजना अशा अनेक योजना राजकीय अनास्थेमुळे रखडल्या आहेत. त्यामुळे आता  शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सत्यजितनाना कदम यांनाच विजयी करा, असे सौ. महाडिक यांनी आवाहन केले.

 माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी विकासाच्या मुद्दयावर ही निवडणूक व्हावी, असे सांगून भाजपच्या सत्यजितनाना कदम यांना विजयी करणे ही काळाची गरज असल्याचे नमुद केले. यावेळी अनिता घाटगे, भुषण पाटील, सरोजिनी यादव, राजसिंह शेळके, विजेंद्र माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706