कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी केवळ वापरा आणि फेकून दया, या नितीचे राजकारण केले आहे. त्यांचे सुडाचे आणि खुनशी राजकारण याच मातीत गाडून, सत्यजित कदम यांच्या विजयातून भाजपचे कमळ फुलवा, असे आवाहन भाजपचे नेते आणि विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार आशिष शेलार यांनी केले.
सार्वजनिक जीवनात ५० वर्षाहून अधिककाळ कार्यरत असणार्या माजी महापौर शिवाजीराव कदम परिवाराच्या बालेकिल्ल्यात कदमवाडी येथे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी आमदार आशिष शेलार यांची जाहीर सभा झाली. भाजप प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला, कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी, मुक्तसैनिक वसाहत, मार्केट यार्ड यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आमदार आशिष शेलार, सदाभाऊ खोत, चित्रा वाघ या प्रमुख वक्त्यांनी भाजपच्या विकासाच्या ध्येयधोरणाची माहिती देत, विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजकीय दहशतीच्या कारभारावर सडकून टीका करत, आमदार आशिष शेलार यांनी विनाकारण भाजपच्या वाटेला गेलात तर, सैल सोडणार नाही, असा खणखणीत इशारा दिला. संधीचे सोने करा, असे चांगल्या अर्थाने म्हंटले जाते. मात्र नामदार सतेज पाटील यांनी गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालावधीत, वैद्यकीय साहित्य, औषधं आणि सामुग्री खरेदीच्या निमित्ताने प्रचंड भ्रष्टाचार केला. कोरोना काळात कोल्हापूर जिल्हयाचा मृत्यूदर देशात सर्वाधिक होता. हे पालकमंत्र्यांचे अपयश असून, या निवडणुकीत कॉंग्रेसचा वचपा काढून जाब विचारा, असे आवाहन आशिष शेलार यांनी केले. संपूर्ण देशात कॉंग्रेसची पिछेहाट सुरू असून, धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणार्या महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवण्यासाठी कोल्हापुरकर पुढे येतील आणि हिंदूत्व टिकवणार्या भाजपला साथ देतील, असा विश्वास आमदार शेलार यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक भाजप विकासाच्या मुद्दयावर लढवत असल्यामुळे पंढरपूर पोटनिवडणुकीच्या विजयाची पुनरावृत्ती कोल्हापुरातही होईल. इथली नारी शक्ती सत्यजित कदम यांना विजयी करेल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणात सत्यजितनाना कदम यांचा विजय ही आता काळया दगडावरची पांढरी रेघ आहे, असं स्पष्ट करत, ही निवडणूक केवळ कोल्हापूर जिल्हयाच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल, असे नमुद केले. महाविकास आघाडीतील तीन पक्ष विरूध्द एकटा भाजप अशी ही लढत होत आहे. विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने ते वैयक्तिक स्तरावर बोलत आहेत. त्यांची राजकीय गुंडगीरी मोडून काढण्याची हीच खरी वेळ आहे. त्यासाठी सत्यजितनाना कदम यांनाच विजयी करा, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी केले. भारतीय संस्कार आणि संस्कृतीचे प्रतिक असणारी दारासमोरील रांगोळी टँकरने धुणार्या प्रवृत्तीची या निवडणुकीत राखरांगोळी होईल, अशा शब्दात माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी टीका केली. अण्णा तुमसे बैर नही, बंटी अब तेरी खैर नही, हा शेर हाळवणकर यांनी उच्चारताच नागरिकांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट केला. तर आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या रांगडया भाषेत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप घाटगे यांनी केला. भाजप शेतकरी आघाडीचे नेते भगवानराव काटे, माजी महापौर सुनील कदम यांचीही यावेळी भाषणे झाली. मेळाव्याला माजी महापौर शिवाजीराव कदम, आमदार रणजितसिंह पाटील, माजी नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यासह पृथ्वीराज महाडिक, संभाजीराव कवडे, वैभव माने, सुभाष संकपाळ, शिवाजीराव माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
