भाजपच्या विकास पर्वाला साथ दया : शौमिका महाडिक

कोल्हापूर : संपूर्ण जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपाची ओळख आहे. काळाची गरज ओळखून राबवलेल्या विकास योजना संपूर्ण जगभर लोकप्रिय झालेले नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, समाजातील प्रत्येक घटकाचा विचार आणि भ्रष्टाचाराला आळा घालत गतीमान सुशासन यामुळे भाजपने देशात दुसर्‍यांदा संपूर्ण बहुमत मिळवले. राज्यातही भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपच्या सत्यजितनाना कदम यांना निवडून देवून, इथल्या स्वाभिमानी जनतेने इतिहास घडवावा, असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी केले.   

कोल्हापूर उत्तरमधील भाजपचे सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ केव्हीज पार्क येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.  त्या पुढे म्हणाल्या, ही निवडणूक कोल्हापूर उत्तरची असली, तरी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणारी आहे. हुकूमशाही विरूध्द कोल्हापूरची स्वाभिमानी जनता अशी ही निवडणूक असून, विकासाची दृष्टी असलेल्या भाजपला साथ दया, असे त्यांनी आवाहन केले. कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्‍न रखडले आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखडा, थेट पाईपलाईन, जयप्रभा स्टुडिओचे अस्तित्व, रंकाळा आणि पंचगंगा नदीचे प्रदूषण अशा प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी भाजपला निवडून देणे आवश्यक आहे. कोल्हापूरला महापूराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. त्यामुळेच सत्यजित कदम यांच्यासारख्या क्रियाशिल नेतृत्वाला विधानसभेत पाठवूया, असे सौ. शौमिका महाडिक म्हणाल्या.

  यावेळी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही भाजपच्या विविध विकास योजनांची माहिती दिली. कोल्हापूरच्या महिला जागरूक असल्याने त्या योग्य उमेदवाराची निवड करतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. यावेळी उमेदवार सत्यजितनाना कदम, प्रांजली परांजपे, कविता लाड, अद्वैत सरनोबत, विनायक हांगीरकर, मामा कोळवणकर यांच्यासह नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

🤙 8080365706