विकासाच्या पोकळ गप्पा मारणार्‍यांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या? : चंद्रकांतदादा पाटील

   कोल्हापूर : कोल्हापुरात दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचू दिल्या नाहीत. ज्यांना गेल्या दहा वर्षात महापालिका स्तरावरील प्रश्‍न सोडवता आले नाहीत, त्यांनी आमदार म्हणूनही काहीही केले नाही. पदाचा आणि सत्तेचा दुरूपयोग करून त्यांनी देवस्थानच्या जमिनी बळकावण्याशिवाय काय केले, हे बिंदू चौकात जाहीरपणे त्यांनी सांगावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

   कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे गार्डनजवळ भाजपाच्या शिवाजी पेठ मंडल आणि सरिता हरुगले यांच्या पुढाकारातून सभा पार पडली. त्याला नागरिकांचा विशेषतः महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेत ते बोलत होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, घोटाळे केले आहेत, त्यांच्यावर कायद्यानुसार ईडी किंवा सीबीआयची कारवाई होणार. त्यात राजकारणाचा प्रश्‍नच नाही. कर नाही त्याला डर कशाला या म्हणीनुसार ज्यांनी स्वच्छ आणि कायदेशीर आर्थिक व्यवहार केले आहेत, त्यांना भीती वाटत नाही. मात्र ज्यांनी सत्तेचा गैरवापर करून आणि सर्वसामान्य माणसाला लुबाडून माया जमवली आहे,  त्यांच्यावर होणार्‍या कारवाईचे सर्वसामान्य माणूस स्वागतच करत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आणि युवतींना अनेक सुविधा दिल्या. महिला सक्षमीकरणासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले आहेत. बचत गटांना बिनव्याजी बँक कर्ज, विद्यार्थीनींना मोफत सायकल, मुलींचा जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न, दारिद्रय रेषेखालील महिलांना मोफत गॅस सिलिंडर, नोकरदार महिलांना गरोदरपणात २६ आठवडयांची पगारी रजा, माता-भगीनींची कुचंबणा लक्षात घेऊन शौचालयांची उभारणी, स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन देणारी योजना अशा अनेक उपक्रमातून भाजपने महिला वर्गाला दिलासा दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील महिला भगिनी सत्यजितनाना कदम यांना विजयी करतील.

 भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, १० वर्षांत भाजपाने गोवा राज्याचा चेहरामोहरा बदलला. भाजपाने केलेल्या विकास कामामुळे आणि हिंदूत्वाच्या जपणुकीमुळे चार राज्यातील जनतेने भाजपला सत्ता दिली. भाजपसाठी संपूर्ण देशभरात चांगले वातावरण आहे. त्यामुळेे कोल्हापुरातही सत्यजितनाना कदम यांचा विजय निश्चित आहे.

या सभेला शिवाजी पेठेतील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी भाग्यश्री इंगवले, भारती जोशी, मिताली पाटील, संगीता खाडे, शिवानी पाटील, पप्पू अजगेकर, संजय जमदाडे, सचिन पवार, ऋतुराज हरूगले, संजय जाधव, संदीप शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706