मुंबई : ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली असून आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता ईडीने थेट कारवाई केली आहे. मुंबईतील एक हजार ४८ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीनं कारवाई केली आहे.
केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप राज्यातील नेत्यांकडून केला जात होता. यामध्ये संजय राऊत यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्यांना फैलावर घेतलं होतं. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, संजय राऊतांनी भाजप नेत्यांसोबतच थेट ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा घणाघाती आरोप केला होता.
