कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, श्री शिलाई मशिन योजना, महिला सक्षमीकरण कार्यक्रम यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ७ वर्षात खर्या अर्थाने नारी शक्तीचा विकास केला. कोल्हापूर जिल्हयात महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनाच विजयी करा, असे आवाहन भाजप महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
जुना बुधवार पेठेत झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची राजकीय दहशत मोडून काढण्यासाठी, आता महिलांनीच रस्त्यावर उतरावे, त्या आंदोलनाचे नेतृत्व आपण करू, असेही वाघ यांनी नमुद केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीतील भाजपचे उमेदवार सत्यजीतनाना कदम यांच्या प्रचारासाठी आज जुना बुधवार पेठ तालमीत जाहीर सभा आणि महिला मेळावा झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक आणि अनुराधा येडके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला, बुधवार पेठ-शनिवार पेठेतील महिलांनी मोठी गर्दी केली होती.
कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची आहे. या मतदार संघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. आजवर ज्यांनी केवळ सुडाचे आणि दहशतीचे राजकारण केले, ते मोडून काढण्यासाठी महिलांची ताकद दाखवूया आणि भाजपला विजयी करूया, असे आवाहन वाघ यांनी केले. ही निवडणूक केवळ सहानुभूतीच्या नव्हे तर विकास आणि विश्वास या दोन मुद्दयांवर भाजप लढत आहे. भारतीय जनता पक्षाच्या १५ महिला विधानसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. तर विरोधी महाविकास आघाडी सरकारमधील महिला आमदारांची संख्या नगण्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या ६० वर्षात कॉंग्रेसला कोल्हापूरमधून एकही महिला आमदार का देता आली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी स्वतःच्या राजकीय हट्टापायी, ही निवडणूक लादली असून, त्यातून पध्दतशिरपणे शिवसेनेचा पत्ता कापण्यात आला, असेही त्यांनी नमुद केले. गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्हयात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. राज्याला दोन गृहराज्यमंत्री असले तरी, राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे. मुळात गृहखातेच बदनाम झाले असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. तर भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी, गेल्या १५ वर्षातील महिला सबलीकरणाच्या प्रयत्नांची माहिती दिली. गृहराज्यमंत्री स्वत:ला जिल्हयाचे पालक नव्हे तर मालक समजत आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय दादागिरी मोडून काढण्यासाठी सत्यजीतनाना कदम यांनाच विजयी करा, असे आवाहन सौ. महाडिक यांनी केले.
उमेदवार सत्यजित कदम यांनी विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वर्षा ढाले, पवित्रा देसाई, संगीता खाडे, शिवानी पाटील, संदीप देसाई, रमेश दिवेकर, धिरज मुळे, अमर बोडके, उदयबाबा भोसले, सुनिल पाटील, राकेश घाटगे, प्रविण चौगले, रोहीत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.