मुश्रीफ यांच्या कुटुंबियावरील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू : किरीट सोमय्या

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी केलेल्या १५८ कोटींच्या घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर ७ जणांविरुद्ध पोलीस एफआयआर नोंदवून चौकशी व कारवाई करतील. तसेच ईडी आणि आयकर विभागाने कारवाई करावी, यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे ट्विट भाजपचे नेते नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 गेल्या काही दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर महाविकास आघाडीचे नेते आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या संबधित काही लोकांची केंद्रीय तपास यंत्रणांनी झाडाझडती घेतली आहे. कोकणातील दापोली दौऱ्यावेळी सोमय्या यांनी पुढील आठवड्यात महाविकास आघाडीतील चार नेत्यांची विकेट जाणार असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर असून मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमय्या यांनी पुण्यात आयकर आयुक्तांची भेट घेतली होती.

मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाच्या कंपनीला १,५०० कोटी रुपयांचे सरकारी कंत्राट दिले होते. राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्याचे हे काम होते आणि त्यासाठी दरवर्षी प्रत्येक ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये भरणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे, मुश्रीफ यांनी पुढील दहा वर्षांसाठी हे कंत्राट देत स्वत:च्या जावयाची सोय लावून दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे, या कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली व मुश्रीफ यांच्या जावयाने आठ महिन्यांपूर्वी ती कंपनी विकत घेतली. पण गेल्या आठ वर्षांत या कंपनीची आवक व एकूण उलाढाल शून्य रुपयांची आहे. कोरोना संसर्गाच्या काळात असंख्य लोकांना आर्थिक फटका बसला व रोजगारासाठी झगडावे लागत होते. अशा वेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी सर्वसामान्यांऐवजी स्वत:चीच घरे भरून घेण्यासाठी सत्तेचा वापर कसा केला, हे सोमय्या उघडकीस आणत आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. मुश्रीफ यांचे कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्याविरोधात केंद्र सरकारने फसवणूक आणि बनावट कंपन्यांसाठी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.