कोल्हापूर : भाजपचा विजयाचा रथ कोल्हापूर उत्तरमध्येही धावणार, सत्यजित कदम विजयी होणार, असा ठाम विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.
भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारासाठी रविवार पेठ, लक्ष्मीपूरी परिसरात आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या.
शोमिका महाडिक म्हणाल्या, कोल्हापूरच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणल्याच्या वल्गना पालकमंत्री करत आहेत. मग हा निधी गेला कुठे? कोल्हापुरातील रस्ते आणि गटारींची दुरावस्था का झाली? निम्म्या शहरात ड्रेनेजलाईन का नाही? अजुनही कोल्हापुरकरांना पंचगंगा नदीचे दुषित पाणी का प्यावे लागत आहे, सध्या शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ का आली? या प्रश्नांची उत्तरे पालकमंत्र्यांना द्यावी लागतील.
पालकमंत्र्यांच्या दिशाभूल तंत्राला आणि दबावाला मतदार बळी पडणार नाहीत, असे सांगत कोल्हापूर उत्तर मतदार संघातून भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी नेहमीच सुडाचे राजकारण केले. केवळ घोषणा करायच्या, लोकांची दिशाभूल करायची आणि युज ॲन्ड थ्रो नितीचा वापर करायचा, हा त्यांचा इतिहास आहे. कोरोना काळात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला, कोल्हापुरकरांवर टोल लादला, देवस्थानच्या जागा हडपल्या. त्यामुळे जनता या निवडणुकीत पालकमंत्र्यांना जाब विचारेल असेही त्या म्हणाल्या. केंद्रातील भाजप सरकारने विकासाच्या अनेक योजना आणल्या. बेटी बचाव-बेटी पढाव, उज्ज्वला योजना, सुरक्षित मातृत्व, सुकन्या समृध्दी, फ्रि शिलाई मशिन अशा योजनातून भाजप सरकारने या देशातील महिलांना सन्मान आणि समृध्दी दिली आहे. त्यामुळेच देशभर भाजपचा विजयाचा रथ धावतो आहे. कोल्हापूर उत्तरमध्येही भाजपच्या सत्यजीत कदम यांना मतदान करा, असे आवाहन शौमिका महाडिक यांनी केले.
कोरोना काळात मोदी सरकारने ८० कोटी जनतेला मोफत रेशनधान्य दिले. १३८ कोटी नागरीकांचे मोफत लसीकरण केल्याचे भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी नमुद केलं. तर दुसर्या बाजुला पालकमंत्र्यांच्या अधिकार कक्षेत असणार्या कोरोना साहित्य खरेदीत जिल्हयात ३५ कोटी रूपयांचा घोटाळा झाला. आता निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे पालकमंत्र्यांची हुकूमशाही विरूध्द लोकशाही अशी आहे.
कोल्हापूर शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपुल बांधणे, रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी आणि जमिनीखालून विद्युत वाहिन्या टाकण्याच्या कामाबरोबरच, महापुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे उमेदवार सत्यजीतनाना कदम यांनी सांगितले.
भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, मारूती भागोजी, हेमंत आराध्ये, गजानन तोडकर यांनीही भाषणे केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगले, माणिक पाटील- चुयेकर, ऍड. बाबा इंदुलकर, सचिन तोडकर, गणेश देसाई, विवेक कुलकर्णी, अमित जाधव, विशाल शिराळकर, आप्पा लाड, अशोक देसाई, शिवाजी माने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.