आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते नाना कदम यांना विजयी करतील : उत्तम कांबळे

कोल्हापूर : उत्तरच्या निवडणुकीत भीमशक्ती महाविकास आघाडीला असा टोला देईन की संपूर्ण राज्यात भूकंप होईल. राजर्षि शाहू महाराजांच्या स्वाभिमानी नगरीत आरपीआय आणि भाजपा परिवर्तन घडवून दाखवतील, असा विश्‍वास आरपीआयच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला.

बालाजी गार्डन येथे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उत्तम कांबळे म्हणाले, गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. हे सरकार केवळ खंडणी आणि भ्रष्टाचारात आघाडीवर असून, गोरगरीब जनतेला वार्‍यावर सोडले आहे. केंद्रातील भाजप सरकारने आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचा उचित सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची दृष्टी आणि गती पाहील्यानंतर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. त्यामुळेच आरपीआयने भाजपला पाठिंबा दिला आहे. आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते नाना कदम यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा दावा कांबळे यांनी केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या कॉंग्रेसने या देशात जाती-धर्मात भेदभाव करून, व्हाेट बँकेसाठी चुकीचे प्रघात पाडले. मात्र भाजप हा सर्वसमावेशक पक्ष असून, राष्ट्रवाद, विकास आणि प्रगती यालाच महत्व देतो. राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड अंतर्गत मतभेद आहेत. केवळ स्वार्थासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असून, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने राज्याला मागे नेले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आणि त्याची सुरूवात कोल्हापूर उत्तरमधून होणार आहे.

सत्यजितनाना कदम यांनी बोलताना भीमशक्तीचा पाठिंबा असल्याने आपला विजय निश्‍चित असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक, उमेदवार सत्यजित कदम, आरपीआयचे प्रा. शहाजी कांबळे, राहुल चिकोडे, मंगलराव मांगले, रूपा वायदंडे, किरण निकाळजे, विश्‍वास सरूडकर, बाळासाहेब वाशीकर, अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे, संजय लोखंडे, दत्ता मिसाळ, अविनाश अंबपकर, राजेंद्र ठिकपुर्लीकर यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.