किरीट सोमय्यांच्या रडारवर हसन मुश्रीफ; ‘आयकर’कडून कारवाईची शक्यता

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळा झाल्याचा आरोप करत मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमय्या आज पुण्यात आयकर आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 गेल्या काही दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर महाविकास आघाडीचे नेते आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या संबधित काही लोकांची केंद्रीय तपास यंत्रणांनी झाडाझडती घेतली आहे. कोकणातील दापोली दौऱ्यावेळी सोमय्या यांनी पुढील आठवड्यात महाविकास आघाडीतील चार नेत्यांची विकेट जाणार असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. त्यांनी ट्विट करत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर असल्याचं सांगितले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर असून मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमय्या आज आयकर आयुक्तांची भेट घेणार आहेत.

हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. पुढच्या काही दिवसांत यावर सुनावणी होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तर आज पुण्यातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मुश्रीफ यांच्याविरोधात केलेल्या तक्रारी विरुद्ध माहिती घेणार आहेत.