कोल्हापूर : महानगरपालिकेचा ३० कोटी रूपयांचा घरफाळा पालकमंत्र्यांनी बुडवला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे उत्पन्न थांबले. मात्र पालकमंत्र्यांनी याच काळात सुमारे २०० एकर जागा खरेदी केली. कोरोना काळात जिल्हा परिषदेच्यामार्फत झालेल्या खरेदीतून ३५ कोटीचा भ्रष्टाचार झाला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता… आणि दोन्हीतून दडपशाही असे त्यांचे खरे रूप असून जनतेला फसवणार्या पालकमंत्र्यांना धडा शिकवा, अशा शब्दात माजी महापौर सुनिल कदम यांनी तोफ डागली.
बापट कॅम्प परिसरातील छावा चौक येथे भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना सुनिल कदम म्हणाले, मुळात संपूर्ण देशातून कॉंग्रेस हद्दपार होत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पूर्ण धुव्वा उडाला. कोल्हापूर महापालिकेतही गेली १० वर्ष कॉंग्रेसच्या पालकमंत्र्यांची सत्ता आहे. पण पालकमंत्र्यांनी केवळ जनतेला फसवण्याचे काम केले आहे. थेट पाईपलाईनचा पत्ता नाही, रंकाळा-पंचगंगेचे प्रदूषण थांबत नाही. देवस्थानच्या जागा लाटायच्या, स्वतःच्या पंचतारांकीत हॉटेलसाठी महापालिकेचे ओपन स्पेस वापरायचे, स्वतःच्या मिळकतींचा ३० कोटींचा घरफाळा बुडवून महापालिकेचे नुकसान करायचे, पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून प्रशासकीय अधिकार्यांवर दबाव आणायचा, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर खुनशी वृत्तीतून अन्याय करायचा, हा पालकमंत्र्यांचा आजवरचा इतिहास आहे. कोरोना काळात शासकीय खरेदीतून जिल्हयात ३५ कोटींचा घोटाळा झाला. त्यावर पालकमंत्री मुग गिळून गप्प आहेत. कोरोना काळात त्यांच्या हॉस्पिटलने हजारो रूग्णांना अक्षरशः लूटले. गोरगरीब आणि सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्टया अडचणीत आला आणि त्याचवेळी यांनी २०० एकर जागा खरेदी केली, असा आरोपही सुनिल कदम यांनी केला.
यावेळी उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम, महेश जाधव, भगवान काटे, राजेंद्र कसबेकर, विजय जाधव, संदीप कुंभार, राजसिंह शेळके, उत्तम मंडलिक, शौकत मुजावर, गणेश देसाई, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, रूपाली कसबेकर, सुधा खांडेकर यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.