कसबा बावडा : दहशत मुक्त कोल्हापूरसाठी भाजपला मतदान करा आणि कोल्हापूर उत्तर मतदार संघातून परिवर्तन घडवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.
कसबा बावडा इथं निघालेल्या प्रचार फेरीनंतर ते बोलत होते. कसबा बावडयात निघालेल्या भाजपच्या प्रचार यात्रेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी सत्यजित कदम, धनंजय महाडिक यांचे औक्षण करून आणि साखर भरवून स्वागत करण्यात आले. तर अनेक महिलांनी भल्या पहाटे उठून रांगोळया काढल्या होत्या.
यावेळी हाळवणकर म्हणाले, भाजपने हिंदुत्वाचा विचार नेहमीच जपला आहे. त्यामुळे कसबा बावडयातून भाजपला भरघोस मतदान मिळेल. कसबा बावडा स्वाभिमानी कोल्हापूरकरांचा प्रभाग आहे. इथली जनता स्वतंत्र बाणेदार विचाराची आहे. संपूर्ण देशात भाजपने केलेली कामगिरी जनतेसमोर आहे. अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम असो किंवा काशीचे पुर्ननिर्माण असो, पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेला सर्जिकल स्ट्राईक, कोरोना काळातील मोफत लसीकरण, सर्वांसाठी विमा योजना, महिलांसाठी आरोग्य योजना, उज्वला योजना, खेलो इंडिया अभियानातून खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन अशा अनेक कामातून भाजपने जनतेची मने जिंकली आहेत. दुसरीकडे राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने मात्र सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत कसबा बावडयातील जनतेने निर्भयपणे पुढे यावे आणि भाजपला मतदान करून, परिवर्तनाची सुरूवात करावी.
धनंजय महाडिक यांनीही आक्रमक शब्दात विरोधकांवर हल्ला चढवला. बावडयातील सुज्ञ जनता आता भाजपला पाठबळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम, प्रदिप उलपे, रूपेश पाटील, अमर साठे यांच्यासह स्थानिक नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते.