पणजी : भाजपचे डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शानदार सोहळा झाला. या सोहळ्यात भाजपच्या ८ मंत्र्यांनी शपथ घेतली.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा दिमाखदार सोहळा झाला. व्यासपीठावर विधान भवनाची प्रतिकृती साकारली होती. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मुख्यमंत्री व ८ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांनी कोकणी भाषेतून शपथ घेतली.
यावेळी आमदार विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.