कोल्हापूर : एखादयाची लग्नगाठ बांधल्यानंतर ती मृत्यूसोबतही कायम राहात असेल तर त्याला काय म्हणावे? पती- पत्नी आयुष्यभर सोबत राहिले. प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना पाठबळ दिलं… आणि मृत्यूलाही एकाचवेळी कवटाळले. आजारपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने रंकाळ्यात आत्महत्या केल्याची हृदयदावक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
विजयमाला बळवंत पाटील (वय ७५) व धोंडिराम बळवंत पाटील (८० दोघेही रा. जाधववाडी. मूळ रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जुन्या काळातील न्यू आनंद सायकल कंपनीचे मालक धोंडिराम पाटील व त्यांच्या पत्नी विजयमाला हे महाडिक कॉलनीत मुलांसह राहत होते; पण आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्यांनी महाडिक वसाहतमधील घर विकले. त्यानंतर ते मुलांसह पाटोळेवाडीत राहिले. नंतर थोडिराम व विजयमाला हे जाधववाडीत खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र राहत होते; त्यांचा खर्च मुले देत होती. मात्र, वृद्धापकाळात जडणाऱ्या आजारपणाला हे दाम्पत्य कंटाळले होते. आणि आजारपणाला कंटाळून त्यांनी एकमेकांचा हात धरून रंकाळा तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.