बहिरेश्वर : वेळ दुपारची… डोक्यावर रणरणतं उन… कोल्हापूरच्या सीपीआर चौकात वाहनांची भाऊगर्दी अन् यावेळी एक अंध व्यक्ती आपल्या पांढऱ्या काठीच्या सहाय्याने रस्ता ओलांडण्याचा पर्यंत करत होती. यावेळी सीपीआर चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या वाहतूक पोलीसाची नजर त्या व्यक्तिकडे गेली. वाहतूक पोलिसाने तातडीने त्या अंध व्यक्तिचा हात पकडत त्याला रस्ता ओलांडून दिला. अन वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले.
याबाबत अधिक माहिती अशी, आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कोल्हापूर शहरात वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच उन्हाचा कडाकाही चांगलाच जाणवत होता. अशा गर्दीतून आपल्या पांढऱ्या काठीच्या सहायाने वाट काढत शरद पाटील ही अंध व्यक्ती पुढे चालली होती. अनेक वाहनचालक तसेच मोटारसायकलस्वार हॉर्न वाजवत त्या व्यक्तीला वळसा घालून जात होते. पण त्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करावीशी वाटली नाही. यावेळी सीपीआर चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संतोष तुकाराम कांबळे यांची नजर शरद पाटील यांच्याकडे गेली. कांबळे तत्परतेने शरद यांच्याकडे गेले. त्यांना हाताला धरुन रस्ता पार करुन दिला व वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले. काही हातावर मोजणा-या कामचुकार आणि लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलाला मान खाली घालावी लागते पण अशा खाकी वर्दी तील माणूसकीचे दर्शन घडवणा-या कर्तव्य दक्ष पोलिस कर्मचाऱ्यांमुळे आज लोकांच्या मनात पोलीसांबद्दल आपूलकी आणि आदर निर्माण झाला आहे.
शरद पाटील हे पन्हाळा तालुक्यातील वाघवे या गावचे आहेत. आपल्या अंधपनावर मात करून ते कोल्हापुरात दसरा चौकात असलेल्या एम्पायर टॉवर इमारतीत लिफ्टमन काम करतात.