देवबाग: महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाच्या घरट्यातून ७४ पिल्ले बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार व सागर प्रेमींनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.
देवबाग – तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवाने अंडी घालून घरटे बनविल्याची घटना कासव मित्र पंकज मालंडकर ११ जानेवारी रोजी समोर आणली होती. सुरुवातीला हे घरटे ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीची असल्याचे बोलले जात होते. परंतु या कासवाचे फोटो आणि व्हिडिओ येथील पर्यावरण विषयक अभ्यासक संदीप बोडवे यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविले होते. या फोटो आणि व्हिडिओ मधील कासव हे ‘ऑलिव्ह रिडले’ या सागरी कासव प्रजाती पेक्षा काहीसे वेगळे वाटत असल्याचे कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कासव अभ्यासकांशी या बाबत चर्चा केली. सखोल माहिती साठी फोटो आणि व्हिडिओ बेंगलोर येथील वाईल्ड लाईफ कॉन्झव्हेशन सोसायटीचे कासव अभ्यासक नुपूर काळे यांनाही पाठविण्यात आले. काळे यांनी या फोटो आणि व्हिडिओंचा अभ्यास केल्या नंतर हे कासव ग्रीन सी टर्टल असल्याचे स्पष्ट केले.