सिद्धार्थनगर गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ….

गोरेगाव: गोरेगाव येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांच्या बांधकामाचा ई शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय बंदरे अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील,मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित… यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले,

• पत्रा चाळ हा विषय अनेकांच्या माहितीचा आहे. गेली अनेक अनेक वर्षे त्याचे दळण दळले पण प्रश्न सुटला नाही.

• आंदोलने झाली, काही लोक हा क्षण पहायला आज हयात देखील नाहीत. त्यांना विनम्र अभिवादन करतो.

• संघर्ष समिती भेटायला आल्यानंतर त्यांना हा प्रश्न सोडवण्याचे वचन दिले होते ते पूर्ण करत आहोत. अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आज आपण साधतो आहोत.

• यासाठी सुभाष देसाई यांनी या कामाचा पिच्छा पुरवला होता. कॅबिनेटमध्येही हाच विषयते काढत असत.

• कामं अनेक असतात, योजना अनेक असतात, अडचणी डोंगराएवढ्या असतात पण एखादी अडचण दूर करायची म्हटलं तर ती दूर करून काम करता येतं याचं हे उत्तम उदाहरण.

• मुंबईत हक्काच घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यादृष्टीनं आजचा शुभ दिन आहे. चिकाटी आणि जिद्द असली की काही करता येते, हे या कामातून दिसते. अनेकजण पोटापाण्यासाठी मुंबईत येत असतात. त्यांचे किमान हक्काचं घर असावे असे स्वप्न असते. ते स्वप्न या कामाच्या निमित्तानं पूर्ण होत आहे.

• आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं एक विनंतीही करतो. सर्वांना लवकरच घर सुद्धा मिळतील. पण एक विनंती आहे, एक अट आहे. हक्काची घरं देत असतांना घर मिळायला जो संघर्ष केला तो संघर्ष विसरू नका.

• घर मिळाल्यानंतर घर विकून हा संघर्ष वाया जाऊ देऊ नका. या घरांसाठी संघर्ष करता, करता, घरांच स्वप्न पाहता-पाहता अनेकजण आपल्यातून निघूनही गेले. या घरात पाऊल टाकताना त्यांची आठवण ठेवा आणि कृपा करून मिळालेली ही घर विकून मुंबई बाहेर जाऊ नका.

• आज तुमच्या हक्काच्या घराचे भुमीपूजन होत आहे. लवकरच घरही मिळेल कृपा करून हे हक्काचे घर सोडू नका, ही माझी अट , विनंती आहे असे समजा. ज्यांचे ज्यांचे या कामासाठी सहकार्य लाभले त्यांना मनापासून धन्यवाद देतो.

• घर झाल्यानंतर चहाला बोलवायला विसरू नका. ज्यांना नवीन घर मिळणार आहे, त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.