इचलकरंजी /मन्सूर अत्तार : वीज सवलत प्रश्नी गांभिर्याने लक्ष घालून रद्द केलेली सवलत पूर्ववत सुरु करुन अडचणीतील यंत्रमाग व्यवसायाला मोठा दिलासा दिल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचा इचलकरंजीतील सर्व यंत्रमागधारक संघटना, महाविकास आघाडीच्यावतीने खासदार धैर्यशील माने आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापूरी फेटा व महालक्ष्मीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ७५ पैशाच्या अतिरिक्त सवलतीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री नामदार शेख यांनी यावेळी दिली.वीज सवलतीसाठी २७ एचपीवरील यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी करताना येणार्या अडचणीमुळे अनेकांनी नोंदणी केलीच नाही. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांची वीज सवलत रद्द करण्याचा आदेश वस्त्रोद्योग विभागाने दिला होता. त्यामुळे वाढीव दराने वीज बिले आल्याने यंत्रमागधारक हवालदिल झाले होते. अशावेळी महाविकास आघाडीची नेतेमंडळी व यंत्रमागधारक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री इचलकरंजीत आले व त्यांनी कार्यक्रमात वीज सवलत रद्दच्या आदेशाला स्थगिती देत ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर केली. याबद्दल महाविकास आघाडी आणि इचलकरंजीतील सर्व यंत्रमाग संघटनांच्या वतीने नामदार शेख यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी खासदार धैर्यशील माने आणि इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी, वीज सवलतीचा प्रश्न ज्याप्रमाणे मार्गी लावला. त्याचप्रमाणे ७५ पैसे अतिरिक्त सवलतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्याचा लाभ यंत्रमागधारकांना तातडीने मिळवून द्यावा. त्याचबरोबर वस्त्रोद्योगाशी निगडीत सर्वच अत्यावश्यक प्रश्न सोडवून अडचणीच्या गर्तेतील यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था द्यावी, अशी मागणी केली.
सत्काराला उत्तर देताना नामदार शेख यांनी, ७५ पैसे अतिरिक्त सवलतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही दिली.यावेळी पालकमंत्री नामदार सतेज पाटील,खासदार धैर्यशील माने, शशांक बावचकर, रविंद्र माने, सुभाष मालपाणी, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, भाऊसो आवळे, इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे सतीश कोष्टी, जागृती यंत्रमागधारक संघेटनेचे विनय महाजन, इस्लोचे गोरखनाथ सावंत, एअरजेट लूम असोसिएशनचे राजगोंडा पाटील, प्रकाश गौड, चंद्रकांत पाटील, सुरज दुबे आदी उपस्थित होते.