इचलकरंजीतील अमन मुजीब कुट्टी याला रौप्यपदक

इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : पालघर (ता. रायगड) येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद ज्युनिअर महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत इचलकरंजीतील अमन मुजीब कुट्टी याने महाराष्ट्र श्री 75 किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केले.

या यशामुळे त्याची 22 व 23 फेब्रुवारी रोजी पाँडेचरी (तामिळनाडू) येथे होणार्‍या ज्युनिअर भारत श्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अमन कुट्टी याने राज्य स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे त्याचबरोबर कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. अमन कुट्टी याने ध्येय व चिकाटीच्या बळावर त्याचबरोबर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अजिंक्य रेडेकर, राष्ट्रीय पंच दीपक माने यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग भरारी घेतली आहे. त्याने आजवर विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तर राज्य स्पर्धेत रौप्य पदक मिळवून क्रीडानगरी इचलकरंजीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सत्कारप्रसंगी जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, राष्ट्रीय पंच दीपक माने, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अजिंक्य रेडेकर, सुहास कांबळे, स्वप्निल कुळवमोडे आदी उपस्थित होते.