सातारा : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.