पिंपरी : सासरच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना परंडवाल चौक, देहूगाव येथे उघडकीस आली. पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केली आहे. याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाबुराव हरकळ असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांचा भाऊ मृत प्रकाश हरकळ हे संरक्षण दलात नोकरीस होते. प्रकाश आणि सिंधू यांचा विवाह झाला. विवाहानंतर पत्नी सिंधू आणि तिच्या माहेरच्या लोकांनी प्रकाश यांना सतत अपमानास्पद वागणूक दिली. आणि फारकतीसाठी दहा लाख रुपये देण्याची मागणी केली. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही आरोपींनी दिली आहे. या त्रासाला कंटाळून प्रकाश यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रकाश यांची बहीण बेबीसरोज विलास डोके (वय 30, रा. परभणी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश यांची पत्नी सिंधू प्रकाश हरकळ, सासरे किसन नामदेव शिंदे, सासू राधाबाई शिंदे, मेहुणा संदीप शिंदे, दामोदर शिंदे (सर्व रा. खालापूर, मूळ रा. नाशिक) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय डमाळ तपास करीत आहेत.