कोल्हापूर : राज्य शासनाने लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी दिली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात दि. 9 जानेवारी रोजीच्या आदेशाद्वारे लागू केलेल्या निर्बंधांना खालील अटी व शर्तीस अधीन राहून दि. 2 फेब्रुवारीपासून शिथिलता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी निर्गमित केले आहेत.
अटी व शर्ती याप्रमाणे-
सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाईन तिकिटासह खुली राहतील. सर्व अभ्यागतांनी पूर्णपणे लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या आस्थापनांच्या नियंत्रण अधिकारी यांनी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वाजवी नियंत्रण ठेवले पाहिजे. सर्व प्रेक्षणीय स्थळे ज्यासाठी तिकीट आहे ते नियमित वेळेनुसार खुले राहतील. सर्व अभ्यागतांनी पूर्णपणे लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या आस्थापनांच्या नियंत्रण अधिकारी यांनी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वाजवी नियंत्रण ठेवले पाहिजे.ब्युटी सलून आणि हेअर कटींग सलूनसाठी निर्गमित केलेले निर्बंध लागू करवून, स्पा 50 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यास परवानगी असेल.अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल. परंतु या ठिकाणी नागरिकांनी कोविड अनुरुप वर्तनाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल .
बगीचे व उद्याने स्थानिक प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार खुली राहतील.करमणूक / थीम पार्क त्यांच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.जलतरण तलाव, वॉटर पार्क त्यांच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.रेस्टॉरंटस, सिनेमागृहे, नाट्यगृहे त्यांच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार सुरु ठेवण्यास परवानगी असेल.भजन आणि सर्व स्थानिक, सांस्कृतिक आणि लोककला कार्यक्रमांना सभागृह / पेंडॉलच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने आयोजन करण्यास परवानगी असेल. लग्नसमारंभास खुल्या मैदानाच्या व बंदिस्त हॉलच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के अथवा 200 यातील जी व्यक्ती संख्या कमी असेल तितक्या व्यक्तीस उपस्थित राहण्यास परवानगी असेल. वरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.