करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा सुरू झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला.

मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचून किरिटापर्यंत त्यांचा प्रवास झाला.या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वार कमानीतून आत आली. त्यानंतर गरुड मंडप, गणपती, कासव चौक, अशी टप्पे पूर्ण करत ६ वाजून १५ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १७ ते १८ मिनिटांपर्यंत ती चेहऱ्यावरून किरिटापर्यंत पोहोचून लुप्त झाली. पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त झाले.दरम्यान, स्वच्छ वातावरण आणि किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर केल्याने रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला.

किरणोत्सव सोहळ्यातील मुख्य दिवस आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. या किरणोत्सव सोहळ्यानिमित्त घाटी दरवाजावरील घंटा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.