पुराच्या काळात गावांसाठी जीव की प्राण असणाऱ्या ‘बोटी’ दुर्लक्षित

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील ३६ गावांमध्ये प्रवासी वाहतूक व शेतकामासाठी आणि महापुराच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नावेचा वापर केला जात आहे. विकासाचा डांगोरा कितीही पिटला तरी या गावांतील वस्तुस्थिती नेत्यांच याकडे लक्ष कधी जाणार? असा परखड सवाल उपस्थित करते. रस्‍ते, पूल बांधणीच्या खर्चापेक्षा पाण्यातील वाहतूक स्‍वस्‍त आणि वेळेची बचत करणारी आहे. अलीकडे काही ठिकाणी पूलच झाले असले तरी महापुरात या गावांना नावेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांसाठी नाव म्‍हणजे जीव की प्राण आहे. असे असले तरी नवीन नावा खरेदी व आहे त्यांच्या दुरुस्‍तीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले बारमाही नद्यांचे जाळे, पश्‍चिम घाटामुळे प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस व त्यामुळे नद्यांना येणार महापूर, हे दरवर्षीचे समीकरण आहे. यातही शिरोळ तालुक्यात कृष्‍णा, पंचगंगेच्या महापुरामुळे दरवर्षी हजारो लोकांना स्‍थलांतरित व्‍हावे लागते. महापुरात रस्‍ते पाण्याखाली जातात. त्यामुळे लोकांना नावेतूनच प्रमुख मार्गांवर आणावे लागते. तालुक्यातील तब्‍बल १७ गावांमध्ये कमी अधिक नावेचा वापर केला जातो. यातील बहुतांश गावांमध्ये महापुराशिवाय त दैनंदिन प्रवासी वाहतूक तसेच शेतकामासाठी नाव वापरली जाते. नदीकाठच्या गावांमध्ये आंबी समाजचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. ते नावाड्याचे काम करतात. त्यांचा चरितार्थच या नावेवर चालतो. शिरोळ तालुक्यातील सांगली जिल्‍ह्यातील तसेच कर्नाटकमधील अनेक गावांमध्ये जाता येते.