गांधीनगर: यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. तरी जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज, तिरंगा मास्क यांची विक्री करतात,तसेच ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना, संघटना अथवा समूह आदी राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले. हे निवेदन पोलीस हवालदार बजरंग हेबाळकर यांनी स्वीकारले.
या वेळी शिवसेनेचे गांधीनगर शहरप्रमुख श्री. दिलीप सावंत, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीने पोलीस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे हा ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. तरी जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज मुखपट्टी विक्री करतात, ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना, संघटना अथवा समूह आदी राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. हिंदु जनजागृती समिती कडून करण्यात आली.