कोल्हापूर: 1996 मध्ये चिमुकल्या मुलांना पळवून त्यांची हत्या करण्याच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. राज्यात 42 लहान मुलांचं अपहरण आणि पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रेणूका शिंदे आणि सीमा गावित यांच्या शिक्षेवर आज अखेर 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निर्णय झाला आहे.
दरम्यान या प्रकरणातील तिसरी आरोपी गावित बहिणींची आई होती पण तिचा जेलमध्येच काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. गावित बहिणींना 2004 मध्ये हाय कोर्टाने फाशीची शिक्षा सुनवली होती. ही शिक्षा टाळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापासून ते अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला होता पण सार्यांनीच त्यांचा गुन्हा माफ करण्यासारखा नसल्याचं सांगत फाशी कायम ठेवली होती.गावित बहिणी आणि त्यांच्या आईचा गुन्हा पाहून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती पण त्याच्या अंमलबजावणीला दिरंगाई झाल्याने अखेर त्यांची शिक्षा टळली आणि आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. आज याप्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने प्रशासनाच्या कारवाई वर ताशेरे ओढले आहेत. तसेच आरोपींचा गुन्हा माफीस पात्र नसल्याचंही नमूद केले पण या प्रकरणात प्रशासनाच्या उदासिनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे देखील कोर्टाने म्हटलं आहे.