मुंबई : चित्रपट दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाची झलक सोमवारी प्रदर्शित करण्यात आली होती.
त्यातील काही दृश्ये ही आक्षेपार्ह आहेत, तसेच यातून स्त्रियांचे आणि लहान मुलांचे चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आल्याबद्दल महिला आयोग तसेच बाल अधिकार संरक्षण आयोगाकडेही तक्रार करण्यात आली. त्यानंतर ही आक्षेपार्ह दृश्ये केवळ प्रोमोच नव्हे तर चित्रपटातूनही काढून टाकण्यात आली असल्याची माहिती मांजरेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. दिवंगत लेखक जयंत पवार यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट शुक्रवार, १४ जानेवारीपासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर यात गिरणी कामगारांची मुले आणि त्यांच्या बायका यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आल्याची टीका सुरू झाली. हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी तक्रार ‘राष्ट्रीय महिला आयोगाने’ केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडे नोंदवली. ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’कडेही या प्रकरणी तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींची दखल घेत चित्रपटात दाखवलेल्या आशयाची तपासणी करण्यात यावी. तसेच पोक्सो कायद्यांतर्गत या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणी ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’ने लेखी पत्राद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. यासंर्दभात मांजरेकरांनी आपला खुलासा द्यावा, अशा आशयाचे निवेदनही ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’ने जाहीर केले.