भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तसेच पुन:बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता टिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे.
या पैशांना स्टेशन डेव्हलपमेंट फी असं नाव देण्यात आलं आहे. वेगवेगळ्या प्रमाणात ही एसडीएफ म्हणजेच स्टेशन डेव्हलपमेंट फीज आकारली जाणार आहे. पाहूयात कोणत्या श्रेणीसाठी किती पैसे आकारले जाणार आहेत. प्रवाशांकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे यानुसार ही रक्कम किती असेल हे निश्चित केलं जाणार आहे. सर्वासामान्यपणे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये (म्हणजेच फर्स्ट क्लास, एसी क्लास) प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक तिकीटामागे १० ते ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. हे शुल्क आकारण्यासंदर्भात रेल्वेने वेगवेगळे नियम निश्चित केले आहेत. यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे निर्देशक (प्रवासी विपणन) विपुल सिंघल यांनी एक अधिकृत पत्र जारी करुन माहिती दिलीय.