पुणे: शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज देयकातून ६६ टक्के सवलत मिळविण्याची संधी मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. मार्च २०२२ पर्यंत चालू वीज देयक तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे.
राज्यात आघाडी घेत पश्चिम महाराष्ट्रात ६ लाख ४५ हजार ८१२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असून, त्यापैकी १ लाख ९४ हजार ३८१ शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत घेत संपूर्ण वीज देयक कोरे केले आहे.राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, वीज देयकातून थकबाकीमुक्ती, स्थानिक वीजयंत्रणेचे विस्तारीकरण आणि सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. चालू आणि थकीत वीज देयक भरण्यातून ग्रामपंचायती, जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी ३३ टक्के असा एकूण ७५५ कोटी ८८ लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीज देयकांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चालू वीज देयकांसह सुधारित थकबाकीचे एकूण ९२९ कोटी ५४ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच ४३२ कोटी ३० लाख रुपयांची माफी तसेच मूळ थकबाकीत १६७१ कोटी ३० लाख रुपयांची सूट मिळाली आहे.