राज्यपालांचा सेनेला झटका

मुंबई वृत्तसंस्था : ठाकरे सरकार  आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून राज्य सरकार आणि राज्यपाल संघर्ष हे प्रकरण ताजं असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका दिला आहे. 

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप  भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत.

सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आतापर्यंत १ हजार ८४४ कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.