राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर आता बैलगाडा शर्यतींचं काय?

मुंबई : राज्यात वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून काही निर्बंध लागू केले आहेत. यासोबतच दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार देखी मोठ्या संख्येने होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इतर गोष्टींवर निर्बंध लागू केले जात असताना नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या बैलगाडा शर्यतींचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही भागात बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाचा घाट घातला जात असताना करोना प्रसाराचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी या शर्यतींबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

“संकट मोठं आहे, आपण मुरड घालायला हवी”

दरम्यान, करोनामुळे राज्यावर आलेलं संकट मोठं असून आपण अशा कार्यक्रमांना मुरड घालायला हवी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. “कुणीही व्यक्ती असली तरी, हे जगावर आलेलं मोठं संकट आहे. आपल्याला माणसाच्या जिवाशी खेळता येणार नाही. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढा. राज्याचे प्रमुख या नात्याने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शर्यती किंवा इतर कार्यक्रमांना आपण मुरड घालायला हवी”, असं अजित पवार म्हणाले.