बांधकाम व्यवसायिकाकडून 12 लाखाची खंडणी मागणाऱ्याला ठोकल्या बेड्या गांधीनगरातील घटना माहिती अधिकाराचा केला दुरुपयोग

गांधीनगर:- सुरू असलेले बांधकाम संबंधित विभागाला सांगून थांबवण्याची भीती घालून बारा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी श्रीनिवास गजानन लाड (वय३७,रा. महाडिक वसाहत मार्केट यार्ड कोल्हापूर) याच्यावर गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची फिर्याद सुपरवायझर नितीन निवृत्ती कदम (वय ४४ रा. सुतार गल्ली उचगाव ता. करवीर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.

 

 

 

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी उचगाव हद्दीत गट क्रमांक १९९/३ या जागेमध्ये तुकाराम नामदेव जाखले यांचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर नितीन कदम यांची सुपरवायझर म्हणून नेमणूक केली आहे. बांधकाम व्यवसायिकांनी संबंधित विभागाचे परवाने घेऊन बांधकाम केले आहे. दरम्यान आरोपी श्रीनिवास लाड यांने कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे कार्यालयातून माहिती अधिकारातून या बांधकामाबाबत माहिती प्राप्त केली.१० फेब्रुवारीला लाड यांने सुपरवायझर नितीन कदम यांची गांधीनगर गणेश टॉकीजवळ भेट घेऊन सुरू असलेल्या बांधकामाबाबत माहिती घेतली आणि मालकाला निरोप देण्यास सांगितले. त्यानंतर १७ फेब्रुवारीला कदमवाडी येथील एका मोठ्या हॉस्पिटल जवळून लाड यांने सुपरवायझर नितीन यांना बोलावून घेतले आणि तुम्ही हे बांधकाम कशा पद्धतीने करत आहात. तुम्हाला बांधकाम परवाना कसा प्राप्त झाला. याबाबत मला माहिती आहे. त्यामुळे मला माहिती अधिकारातून या बांधकामाबाबत सगळी माहिती मिळाली आहे. त्यामुळे मी या बांधकामावर प्राधिकरण विभागाकडे तक्रार करून तुमचे बांधकाम थांबवणार आहे. ते थांबवायचे नसेल तर मला प्रत्येक बांधकाम गाळ्याला दोन लाखा प्रमाणे सहा गाळ्यांचे 12 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर मी तुमच्या बांधकामाची तक्रार करून तुमचे बांधकाम बंद पडणार अशी धमकी देऊन खंडणी मागितली. या प्रकरणाची माहिती मिळताच गांधीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.त्यानुसार पोलिसांनी आरोपी श्रीनिवास लाड याला अटक केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार संदीप जाधव करीत आहेत.

 

🤙 8080365706