लोकनेते स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वासह लौकिकाला साजेसे स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारू

कोल्हापूर:लोकनेते कै. अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्व आणि लौकिकाला साजेसे स्मारक आणि पुतळा कोल्हापुरात उभारूया, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी के एस बी पी चौकातील जागेची पाहणी केली.

 

 

मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात म्हणाले, यापूर्वी महापालिकेने के एस बी बी च्या माध्यमातून ही जागा विकसित केली होती. या जागेवर कै. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याबद्दल मी कोल्हापूर महापालिकेचा आभारी आहे. कै. अजितदादांना अपेक्षित असलेला विकासाचा ध्यास कोल्हापूर महापालिका पूर्ण करेल. ज्यावेळी कोल्हापूरच्या प्रदूषित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी त्यांनी सासने मैदानावरील कार्यक्रमात सांगितले होते की, काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणणारच. अन्यथा; पवारांची अवलाद सांगणार नाही. त्यानंतर आयटी व इतर अनेक विकासाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले.

महापौर सौ. रूपाराणी निकम म्हणाल्या, कै. अजितदादा पवार यांची कायमस्वरूपी आठवण राहावी आणि त्यांच्या कार्याचा आदर्श कोल्हापूरकरांसमोर हवा म्हणून हा पुतळा उभारणार आहोत. कोल्हापूर शहरातील दोन- तीन जागा पाहिल्या. प्रथमदर्शनी त्यांच्या पुतळ्याचे दर्शन व्हावे या भावनेतून ही जागा निवडलेली आहे. या जागेवर पुतळ्यासह त्यांचे चांगल्या पद्धतीचे प्रेरणादायी स्मारक उभारूया

कोल्हापूरवर विशेष प्रेम…..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, ही जागा म्हणजे कोल्हापूरचे दक्षिण महाद्वार आहे. कै. अजितदादा पवार यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. योगायोगाने ही जागा कै. अजितदादांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली आहे. या जागेजवळच शिवाजी विद्यापीठाचे कॅन्टीन होते. त्यामध्ये ते दुपारी बसत असत. शिवाजी विद्यापीठाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ५० कोटी निधी दिला होता. तसेच; राजाराम महाविद्यालयालाही मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील शहाजी महाविद्यालयातच झाले होते. ते गंगावेसच्या आणि बी. टी. कॉलेजच्या कट्ट्यावर बसून दूध प्यायचे. रंकाळ्यावर फिरायला जायचे. अशा अनेक त्यांच्या आठवणी होत्या.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, महापौर सौ. रुपारणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, भाजपाचे गटनेते मुरलीधर जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, भाजपाचे महानगराध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, कोल्हापूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दिंडे, नगर रचनाकार रमेश मस्कर आदी प्रमुखांची उपस्थिती होती.

🤙 8080365706