कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात कोल्हापुरी चप्पल उद्योगाच्या सुरक्षा आणि प्रगती विषयी विधेयक मांडले आहे. त्यातून कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन करण्यासाठी, खासदार महाडिक यांचा प्रयत्न आहे. चर्म उद्योगातून स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्चित करण्यासाठी हे विधेयक महत्वपर्ण आहे.

सध्या नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचे विधेयक मांडले. कोल्हापुरी लेदर क्राफ्ट प्रिझर्व्हेशन ऍन्ड लाईव्हली हूड सिक्युरिटी बिल या नावाने मांडलेल्या या विधेयकातून पारंपारिक चर्म उद्योगाला सुरक्षा स्थिरता आणि प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. खासदार महाडिक यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर करून, कोल्हापुरी चप्पल आणि अन्य चर्म उत्पादनांचा प्रचार आणि विकास करणे, पारंपारिक कलेचे जतन आणि संरक्षण करणे आणि या क्षेत्रात काम करणार्या नोंदणीकृत कामगारांच्या रोजगाराची सुरक्षा अबाधित ठेवणे, हा हेतू असल्याचे स्पष्ट केले. कोल्हापुरी चप्पल जगभर प्रसिध्द आहे. याशिवाय विविध प्रकारच्या चर्म उत्पादनांनाही वाढती मागणी आहे. अशा परिस्थितीत खासदार धनंंजय महाडिक यांनी संसदेत सादर केलेले विधेयक अत्यंत महत्वपूर्ण आहे.
