कडगांव:कडगाव ता. गडहिंग्लज येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहताना मंत्री हसन मुश्रीफ निशब्द आणि निस्तब्ध झाले. त्यानी जड अंतकरणाने आणि भरल्या डोळ्यांनीच कै. अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहिला. दुखावेग आवरता येणार नाही म्हणून श्रद्धांजली वाहिल्यानंतर उपस्थितांना नमस्कार करीत एकही शब्द न बोलता गाडीत बसून परतीचा मार्ग धरला.
पूर्व नियोजनानुसार कडगाव ता. गडहिंग्लज येथे कडगाव – गिजवणे मतदारसंघातील प्रचारसभा आज होणार होती. तीन दिवसांचा दुःखवटा असल्यामुळे आणि श्री. मुश्रीफ यांची मनस्थिती चांगली नसल्यामुळे ही सभा रद्द केली होती. परंतु; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना “तुम्ही या. आपण कै. अजितदादांना श्रद्धांजली वाहूया,” असा आग्रह केला. सायंकाळी बरोबर सात वाजता कडगाव येथे पोहोचत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कै. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोभावे हात जोडत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नामदार अजितदादा पवार यांच्या जाण्याने मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यावर, पवार कुटुंबीयांवर, पक्षावर आणि एकूणच महाराष्ट्रावर डोंगराएवढे दुःख कोसळलेले आहे. या दुःखाचा आघात प्रचंड असल्यामुळे यातून सावरायला अवधी लागेल, अशी चर्चा होती.
ए. आय. च्या आवाजाने मुश्रीफांना गहिवर…..!
स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी कै. अजितदादांचे ए. आय. निर्मित भाषण लावले होते. ते ऐकून तर मंत्री श्री. मुश्रीफ अधिकच गहिवरले आणि निस्तब्ध झाले. त्याना दुखावेग आवरता आला नाही. भरल्या डोळ्यांनीच गाडीत बसून बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले.
