कागल:
कागल येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय” अशा गजरासह भाविकांच्या उत्सफुर्त सहभागामुळे शहर परिसर स्वामीमय झाला.
सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी कृपावंत होऊन आपल्या पवित्र पादुका अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांना प्रदान केल्या होत्या. या पादुका श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या पुढाकाराने प्रथमच कागल व परिसरातील भाविकांना दर्शनासाठी आणल्या होत्या.सकाळी सात मोटेच्या विहिरीवरील बंगल्यामध्ये पादुकांचा विधिवत अभिषेक सोहळा मंत्रोघोषात श्रीमंत प्रवीणसिंहराजे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ. नंदितादेवीराजे यांच्या अमृतहस्ते पार पडला.
त्यानंतर बसस्थानक शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या पवित्र पादुकांचे आगमन झाले. तिथून सजविलेल्या पालखीतून टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीराम मंदिरमध्ये या पादुका आणल्या. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी औक्षण केले. तसेच पुष्पवृष्टीही केली.त्या येथे विधिवत पूजन करून भाविकांना दर्शन व कृपाआशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी विधिवत विराजमान करण्यात आल्या. पादुका दर्शनासाठी दिवसभर नागरिकांनी रिघ लावली होती.
यावेळी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे, श्रीमंत सयाजीराजे भोसले, राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे ,वीरेंद्रसिंहराजे घाटगे, यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
भोसले व घाटगे घराण्याच्या ऋणानुबंधांना उजाळा
*छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज, कागल सिनियर सरकार प्रवीणसिंहराजे ,समरजितसिंहराजे व विरेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने कागलमध्ये या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . कागलचे घाटगे व अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे जवळचे ऋणानुबंध आहेत. कागल जहागिरीच्या राजमाता,स्व.विक्रमसिंहराजे व प्रवीणसिंहराजे यांच्या मातोश्री स्व. विजयादेवी घाटगे यांचे माहेर अक्कलकोटच्या भोसले घराण्यातील आहे. तसेच श्रीमंत पिराजीराव महाराज यांच्या ज्येष्ठ सुकन्या ताराराणीदेवी अक्कलकोटच्या भोसले घराण्यातील स्नूषा असून तिसरे फत्तेसिंह महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. या निमित्ताने कागलवासियांनी या ऋणानुबंधांनाही उजाळा दिला.
छायाचित्र कागल येथे ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये भाविकांना दर्शनसाठीश्री स्वामी समर्थांच्या पादुका विराजमानवेळी श्रीमंत राजे प्रवीणसिंह घाटगे,अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे श्रीमंत सयाजीराजे भोसले,श्रीमंत नंदितादेवी घाटगे, सौ नवोदितादेवी घाटगे वीरेंद्रसिंहराजे घाटगे. व मोठ्या संख्येने सहभागी भाविक
