कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडण्यात महापालिका प्रशासनही कारणीभूत असल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात शंखध्वनी केला.
हद्दवाढीबाबत प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने उदासीनता दाखवली असा आरोप कृती समितीने केला. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने आता काही वर्षे हद्दवाढ करता येत नाही. निवडणुकीच्या आधी हद्दवाढ करा म्हणत कृती समितीने आंदोलने, मोर्चे, निवेदने देऊन हद्दवाढीचा मुद्दा चर्चेत ठेवला होता; मात्र निवडणूक जाहीर झाल्याने हद्दवाढीचा प्रश्न गुंडाळला गेला आहे. त्यामुळे कृती समितीने शंखध्वनी करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींचाही निषेध केला. याबाबतचे निवेदन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे, गेल्या पाच वर्षांत प्रशासकांच्या काळात हद्दवाढ करण्याची संधी वाया घालवली. शहराची वाढलेली लोकसंख्या, वाढलेली वाहने, प्रदूषण यामुळे शहरात आनंदाने जगणे महाकठीण झाले त्यामुळे नागरिकांकडून घरफाळा वसूल करण्याचा अधिकार राहिलेला नाही. यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, सचिन चव्हाण, अॅड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्ट, अविनाश दिंडे उपस्थित होते.
