विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडूनआढावा

कोल्हापूर :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्‍या विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडूनआढावा उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण, कोल्हापूर शहरातील उड्डाण पूल, केंद्रीय विद्यालय, पीएम ई बसेस यासह विविध विकासकामे पावसाळी अधिवेशनाद्वारे मार्गी लावणार, खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्‍या विविध विकासकामांची सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना यासंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यामध्ये उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण, कोल्हापूर शहरात होणारे उड्डाण पूल, नियोजित केंद्रीय विद्यालय, पीएम ई बसेस यासह विविध कामांचा समावेश होता. ही सर्व कामे पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून युध्द पातळीवर मार्गी लावली जातील, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
केंद्र सरकारचे २१ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन एक महिना चालणार आहे. या अधिवेशनात कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असणारी विकासकामं मार्गी लावण्याचा निर्धार खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सध्या कोल्हापूर जिल्हयात केंद्र सरकारच्या माध्यमातून बास्केट ब्रिजचे काम हाती घेतले आहे. तसेच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाण पूल प्रस्तावित आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी पुणे-बेळगावच्या धर्तीवर कोल्हापूर मध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी खासदार महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर खासदार महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री ई बसेस योजनेतून कोल्हापूर शहरासाठी १५० बसेस मंजूर झाल्या आहेत. या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. केंद्रीय विद्यालयासंबंधीची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडून त्यांनी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी, उजळाईवाडी विमानतळाची धावपट्टी ३ हजार मीटर वाढवणे व टर्मिनल बिल्डिंगचा विस्तार करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातून कोल्हापूरची हवाई सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचण्यास मदत होईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी शिरोली पूल येथे होणार्‍या बास्केट ब्रिजचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी आपले प्राधान्य राहील. हा आपला ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्याच्या जोडीला तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरही राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने उड्डाण पूल उभारला जाणार आहे. त्याचाही आपण या पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
पुणे-बेळगावच्या धर्तीवर कोल्हापुरमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा आपला मनोदय आहे. त्याचा अंतिम प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंजुरीसाठी पाठवलाय. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने या विद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. प्रधानमंत्री ई बसेस योजनेमधून कोल्हापूर शहरासाठी आपल्या प्रयत्नातून १५० बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापुरात १५ ऑगस्टपर्यंत ५० बसेस दाखल होण्यासंबंधी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

🤙 9921334545