*मुंबई कोल्हापूर :-जिल्ह्याचा उपजिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडहिंग्लज शहराला प्रशासकीय इमारतीची फार मोठी गरज होती. परंतु; 1960 पासून जागेचा प्रश्न भिजत पडला होता. आज मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा प्रश्न निकालात निघाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गडहिंग्लज शहरात आजरा रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची १२२ गुंठे जागा आहे. त्यापैकी ४७ गुंठे जागा पशुसंवर्धन विभागाला ठेवून उर्वरित ७५ गुंठे जागेवर प्रशासकीय भवन बांधकामाचे आरक्षण होते. मुंबईतील आजच्या बैठकीत ही जागा प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करणे आणि त्यावरती नियोजन विभागामार्फत इमारत बांधणे, हाच या बैठकीचा मुख्य विषय होता.
*नागपूर अधिवेशनात होणार बजेटची तरतूद…..!*
या बैठकीतच उपमुख्यमंत्री तथा; वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा याला येणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बजेटची तरतूद करण्याचे आदेश दिले. तसेच; कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे यांना ताबडतोब अंदाजपत्रक तयार करण्याचे आणि गडहिंग्लज शहरातील सर्वच सरकारी कार्यालय प्रशासकीय भवनामध्ये समायोजित होतील, अशा पद्धतीचा चांगला व्यापक आराखडा तयार करण्याच्याही सूचना दिल्या.
*अजितदादा आणि पंकजाताईंचे मंत्री मुश्रीफ यांनी मानले आभार…..!*
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजच्या प्रशासकीय भवन इमारतीच्या जागेचा विषय उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी गांभीर्याने घेतला. तसेच; पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे आणि त्या विभागाचे सचिव डाॅ. रामा स्वामी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले.
*या कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत……!*
प्रशासकीय भवनाच्या बांधकामानंतर पुढील कार्यालयांना मिळणार स्वतःची हक्काची इमारत. यामध्ये गडहिंग्लज- चंदगड प्रांताधिकारी कार्यालय, आजरा चंदगड पोलीस उपाधीक्षक कार्यालय, उत्पादन शुल्क कार्यालय, गडहिंग्लज तहसीलदार, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार विभाग, वैधमापन विभागाचे वजनकाटे निरीक्षक, तलाठी कार्यालय या सर्व कार्यालयांचा समावेश आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, वित्त विभागाचे सचिव ओ. पी. गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डाॅ. रामा स्वामी, नियोजन विभागाचे सचिव डाॅ. राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि निवासी जिल्हाधिकारी संजय तेली हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले. तसेच; नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवानंद ढेकळे, माजी उपनगराध्यक्ष किरणअण्णा कदम, माजी नगराध्यक्ष बसवराज खनगावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक शहराध्यक्ष रामगोंडा उर्फ गुंडेराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, माजी उपनगराध्यक्ष हरून सय्यद, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महेश सलवादे, रचना सहाय्यक विशाल बेंडखळे, विनोद बिलावल आदी प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.