कुंभोज (विनोद शिंगे)
इंगळी (ता. हातकणंगले) येथील सहामोट विहिरीवरील संरक्षक भिंत ढासळून अंदाजे दोन ते तीन महिन्यापूर्वी भूस्खलन झाले होते , यामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूला असणारे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची ७ ते ८ दुकाने या विहिरीमध्ये बुडाली होती.
या व्यापाऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही आर्थिक मदत प्रशासनाकडून मिळाली नव्हती तसेच कोसळलेल्या संरक्षक भिंतीची देखील कोणतीही डागडुजी अजून पर्यंत केलेली नव्हती, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी संरक्षण भिंतीचा आणखीन थोडा भाग या विहिरीमध्ये ढासळला.
दैव बलवत्तर म्हणून विहरीच्याकडेला असणाऱ्या रहिवाशांच्या घराला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही, जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या नागरिकांच्याकडे प्रशासन कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्या अनुषंगाने इंगळी गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अवाहनानंतर पक्षाचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील तसेच जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सदरील ठिकाणची पाहणी केली.
यावेळी बोलताना, उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी लवकरात लवकर सदरील धोकादायक बनलेल्या विहिरीवर कायमस्वरूपी तोडगा काढून या विहिरीच्या कडेला राहणाऱ्या लोकांना भयमुक्त करावं अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने व्यापक स्वरूपाचे जन आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला.
यावेळी इंगळीचे सरपंच दादासाहेब मोरे, शिवसेना शहरप्रमुख केशव पाटील, उमेश शिंदे, गणेश नाईक, संदीप कदम यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज