कोल्हापूर : महाराष्ट्रात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा(एआय) वापर झपाट्याने वाढत असून,राज्य सरकार आणि कृषी विज्ञान केंद्र यांचा या दिशेने ठोस पुढाकार आहे.अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र हा पहिला राज्य आहे जिथे एआयच्या आधारे शेती सुधारण्याचे प्रयोग प्रत्यक्ष अंमलात आणले जात आहेत.मायक्रोसॉफ्ट,ऑक्स्फर्ड विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त सहयोगातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान बदल,कीड नियंत्रण,माती परीक्षण,खत व्यवस्थापन आणि पीक उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी एआय अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पारंपरिक शेती पद्धतीत बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणे ही काळाची गरज असून,त्यातून उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ साधता येईल.एआयच्या मदतीने शेतकरी अधिक शास्त्रशुद्ध आणि निर्णयक्षम शेती करू शकतील,असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे विशेषतज्ञ संतोष करंजे यांनी व्यक्त केला.
शरद सहकारी साखर कारखाना व शरद कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पिक परिसंवाद जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे संपन्न झाला, यावेळी करंजे बोलत होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय शामरावअण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुभाषसिंग रजपूत यांनी केले.
यावेळी बोलताना संतोष करंजे म्हणाले,
सध्या शेती क्षेत्र अनेक अडचणींना सामोरे जात असून,उत्पादनक्षमता घटली आहे आणि कारखान्यांची कार्यक्षमता वाढवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन व शरदचंद्रजी पवार यांच्या पुढाकाराने कृषी व औद्योगिक क्षेत्र एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतील प्रगतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ आधुनिक तंत्रज्ञान नसून,ती पूर्वीपासून मिळालेली माहिती,हवामान,माती, जैविक परिस्थिती व उत्पादनशक्ती यांचा अभ्यास करून शेतकऱ्याला योग्य सल्ला देणारी प्रणाली आहे. पारंपरिक सल्लागार किंवा स्थानिक मार्गदर्शक सर्वत्र पोहोचू शकत नसल्याने एआय आधारित मार्गदर्शन ही काळाची गरज ठरते.मोबाईल मेसेजद्वारे शेतकऱ्याला अचूक, विज्ञानाधारित सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे उत्पादन वाढू शकते.
हे तंत्रज्ञान कोल्हापूर,सांगली,नांदेड, नाशिक,बेळगाव अशा विविध भागांतील शेतकऱ्यांनी यशस्वीपणे स्वीकारले आहे.शेतीला वैद्यकीय उपचारांप्रमाणे तंतोतंत सल्ल्यानुसार चालवले,तर शेवटपर्यंत चांगला निकाल मिळतो.त्यामुळे शेतकरी आणि कारखान्यांनी एकत्र येऊन आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेती आणि उद्योग दोघांचाही सर्वांगीण विकास शक्य आहे.एआय चा वापर करून १५० टनांपर्यंत उत्पादन घेतल्याची उदाहरणे त्यांनी स्क्रिनव्दारे दाखविली.तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांनी दाखविल्या.यावेळी शेतकऱ्यांनी एआय संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले.
यावेळी भाषणात गेल्या २५ वर्षांपासून सुरु असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला.सध्याची परिस्थिती बदलत असून,ऊसाचे क्षेत्र व दर यांना मर्यादा येत चालल्या आहेत.यामुळे उत्पादन खर्च वाढत असून,साखर कारखान्यांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर,AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर हा काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी,शेतीमध्ये स्मार्ट सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणाच्या साहाय्याने निर्णय घेणं आवश्यक ठरत आहे. त्यातून शेतकऱ्याला उत्पादन वाढवण्याची संधी मिळू शकते. महापुरामुळे गावांमध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा त्यावर प्रभावही लक्षात घेण्याची गरज व्यक्त केली.
शेतकरी मेहनतीचा आहे,परंतु त्याला योग्य मार्गदर्शन,प्रशिक्षण आणि तंत्राची साथ मिळाली तर तो अधिक प्रगत होईल.डेमो प्लॉट्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष बदल दाखवता येतील.शेवटी,बदल स्वीकारणं आणि नव्या जगाबरोबर चालणं ही जबाबदारी असून,त्यासाठी कारखाना, कृषी महाविद्यालय आणि संस्थांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी वैज्ञानिक अधिकारी डॉ. समाधान सुरवशे,कृषी अधिकारी चंद्रकांत जांगडे,कारखान्याचे व्हा चेअरमन थबा कांबळे,अमरसिंह पाटील,विजय देसाई,मल्लाप्पा चौगुले, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.आवटी,प्रभारी कार्यकारी संचालक एम.एम.पट्टणकुडे, रणजित पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक,सभासद, शरद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिरोळ,हातकणंगले तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.