कोल्हापूर:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वरील यमगर्णी-सौंदलगा दरम्याच्या वेदगंगा नदीवरील मांगुर फाटा येथे भरावा टाकून पूल बांधण्याऐवजी पिलरचा पूल उभारण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. त्याबद्दल या प्रश्नाचा शेतकऱ्यांच्या सोबत सातत्याने पाठपुरावा करणारे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मंत्री गडकरी यांचा कोल्हापूर येथे भेट घेऊन आभार मानले.
याबाबत अधिक माहिती अशी.यमगर्णी-सौंदलगा दरम्याच्या वेदगंगा नदीवरील मांगुर फाटा या ठिकाणी प्रथमतः भराव टाकून पूल बांधणी करण्यात येणार होती. यामुळे आजूबाजूच्या तब्बल २५ ते ३० गावांना पुराचा धोका संभवत असल्याने शेतकरी वर्गातून पिलरचा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत होती. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य मागणीला लोकप्रतिनिधी या नात्याने पाठिंबा देत प्रशासनाकडे कर्नाटकचे माजी राज्यमंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खा. अण्णासाहेब जोल्ले आणि निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या आ. शशिकला जोल्ले यांच्यासह पाठपुरावा केला होता. सदर ठिकाणी भराव न टाकता पिलरचा पूल बांधण्यात यावा, अशी भूमिका घेतली होती.त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश आले आहे. आता या ठिकाणी पिलरचा पूल बांधण्याचे आदेश मंत्री गडकरी यांनी दिले आहेत. त्याबद्दल घाटगे यांनी समस्त शेतकऱ्यांच्या वतीने गडकरी यांची कोल्हापुर येथे भेट घेऊन आभार मानले
कागलमध्येही पिलरचा पूल उभारण्यास ना.गडकरी यांनी दिली मंजुरीची ग्वाही-समरजितसिंह घाटगे
मांगुरप्रमाणे कागल येथेही भरावाऐवजी पिलरचा पूल उभारण्यासाठी घाटगे यांनी सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबत मंत्री गडकरी यांना आठवण करून दिली. यावर गडकरी यांनी कागल येथेही पिलरचा पूल उभारण्यास लवकरच मंजुरी देऊ असे सांगितले आहे.अशी माहिती घाटगे यांनी दिली.