कुंभोज (विनोद शिंगे)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित 29 व्या पुरूष कामगार व 19 व्या महिला कामगार खुल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार पुरूष भजनी मंडळाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
कोल्हापूर गट कार्यालयामार्फत कामगार कल्याण भवन इचलकरंजी यांचेवतीने कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार पुरूष भजनी मंडळाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पुरूष 19 व महिला गटातील 19 संघांनी भाग घेतला होता.
कारखान्याच्या संघातून गायक व हार्मोनियम वादक अजित शिंदे, तबलावादक शुभम तुरंबेकर, पखवाज वादक सुनिल पाटील तसेच विणावादक भाऊसो डोंगरे, सहगायक भीमराव जाधव, पांडूरंग पाटील, सुनिल केसरकर, भीमराव परीट, अशोक सुतार, सुभाष बत्ते, राजेंद्र तासगांवे, रतन बाणेदार या कलाकारांनी सहभाग घेतला.
या भजनी मंडळास कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राहूल आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तर जवाहर साखर कामगार संघटना, कोल्हापूर गट कार्यालयाचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे व इचलकरंजी कामगार भवन केंद्र संचालक सचिन खराडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कारखान्यातील कामगारांना दैनंदिन कामाबरोबरच त्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळावा यासाठी गायन, लेखन, क्रिडा, साहित्य यासाठी नेहमीच प्रोत्साहन आणि मार्गदर्शही केले जाते. त्याचबरोबर कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय उपचारासाठी मेडीक्लेम, कामगार कल्याण मंडळामधून आर्थिक मदत मिळण्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाते.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नाशिक येथे सहाय्यक कामगार आयुक्त विकास माळी, नाशिकचे पोलिस आयुक्त विक्रम देशमाने, ह.भ.प. श्रावण महाराज आहिरे, राष्ट्रीय किर्तीचे शास्त्रीय गायक पंडित प्रसाद कोपार्डे यांच्या उपस्थितीत आणि कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.