कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे न संपणारी आहे. शिवसेनेतील उठावानंतर शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जनतेने कौल दिला.
कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर आणि लोकहिताचे निर्णय घेणारे “कॉमन मॅन” मुख्यमंत्री अशी शिवसेनेचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा जनसामान्यात तयार झाली आहे. शिवसेनाप्रमुखांची जयंती व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने “शिवकार्य” मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाची सुरवात आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत शिवसेनेच्या वतीने शहराच्या प्रमुख प्रवेश मार्गावर स्वागत फलक लावण्यात आले असून, नवीन वाशी नाका या शहराच्या प्रवेश मार्गावरील स्वागत फलकाचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, या उपक्रमातून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीस बळकटी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात “शिवकार्य” उपक्रम जोमाने राबविला जाणार आहे. शिवसेनेला संघर्षाची पार्श्वभूमी आहे. शिवसेनाप्रमुखांनी अन्यायाविरोधात लढण्यासाठी नेहमीच चळवळीना बळ दिले. संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या शाखांची स्थापना झाली, त्यातूनच लोकांना न्याय देण्याचे कार्य घडू लागले. आजही रक्तदान, आरोग्य शिबीरासह नागरिकांचे किरकोळ प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांचे पाय आपोआप शिवसेनेच्या शाखांकडे वळतात. या शाखेतूनच आपले काम मार्गी लागणार असा विश्वास जनतेत आहे. त्यामुळे या शिवकार्य उपक्रमातून प्राथमिक स्वरूपात शहरात सुमारे २२ ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विभागीय संपर्क कार्यालय ही संकल्पा राबविणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असून, शहरात ५ ठिकाणी शिवसेनेच्या संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासह शहरातील ८ प्रवेशद्वारांजवळ शिवसेना पक्षाच्या वतीने सहर्ष स्वागत फलकाचे उद्घाटन पार पडणार आहे. यासह प्रामुख्याने शिवसेना सभासद नोंदणी प्रत्येक प्रभागात करण्यात येणार आहे.
मुंबई आणि ठाण्यानंतर कोल्हापूर जिल्हाच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे वेळोवेळी शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे बाळकडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकहिताच्या कामांचा धडाका शिवसैनिकांनी अंगिकारला असून, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम जोमाने राबवून शिवसेनेचा भगवा झंजावात शहरात निर्माण करू, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, जेष्ठ शिवसैनिक साळोखे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, कमलाकर जगदाळे, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, समन्वयक पूजा भोर, शिव उद्योग सेना महिला जिल्हाध्यक्षा मंगलताई कुलकर्णी, राधिका पारखे, प्रीती अतिग्रे, उपशहर सुरेश माने, फेरीवाले सेना शहरप्रमुख विजय जाधव, वैद्यकीय समन्वय कक्षाचे प्रशांत साळुंखे, राजू जाधव आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.