महिला वर्ल्डकप खोखोपटू वैष्णवी कोल्हापुरात येताच तिचा जाहीर सत्कार करणार ; मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : दिल्लीत नुकत्याच पहिल्या महिला वर्ल्डकप खो-खो स्पर्धा झाला. या स्पर्धेत भारतीय संघात करंजीवने (ता. कागल) येथील कन्या वैष्णवी बजरंग पोवार हिचा समावेश होता. भारतासह जगातील 24 देश सहभागी झालेल्या स्पर्धेत हा वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला. या जागतिक पातळीवरील यशाबद्दल कु. वैष्णवी पोवार हिचे दूरध्वनीद्वारे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

 

 

दूरध्वनीवरून वैष्णवीशी बोलताना, वैष्णवी, तुझ्या या यशाचा आम्हा समस्त कोल्हापूर जिल्ह्यासह भारतवासीयांना सार्थ अभिमान आहे. खेळाडू म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे आहोत. अजूनही यशाचा फार मोठा पल्ला तुला गाठायचा आहे. वैष्णवी कोल्हापुरात येताच तिचा जाहीर सत्कार करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

पॉवरलूमच्या व्यवसायानिमित्त वैष्णवी पोवार यांचे कुटुंब इचलकरंजीत चंदुर- शाहूनगर येथे वास्तव्यास आहे. ती इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी कला शाखेमध्ये शिकत आहे. भारताच्या संघात एकूण 12 महिला खेळाडूंचा समावेश होता. त्यामधील महाराष्ट्रातील चौघींपैकी वैष्णवी कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव आहे.

याबाबत वैष्णवी म्हणाली, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी माझ्या यशाची नोंद घेऊन केलेल्या अभिनंदनामुळे माझा ऊर आनंदाने आणि अभिमानाने भरून आला आहे. त्यांचे पाठबळ मला माझ्या खेळाच्या कारकिर्दीसाठी सतत प्रेरणादायी ठरेल.

उपांत्य सामन्यासाठी भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ यांच्यामध्ये जोरदार लढत झाली. या सामन्यामध्ये वैष्णवीला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे.