मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज (दि.२३) रोजी दुपारी परभणी शहरात दाखल झाले. परभणी हिंसाचारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेत राहुल गांधींनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी खा. राहुल गांधी यांच्याकडे केली.
10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणी येथील रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या काचेच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यावेळी अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. यानंतर राजकारण पेटलं होतं. या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज राहुल गांधी आले होते. राहुल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबियांसोबत २० ते २५ मिनीटे चर्चा केली आहे. राहुल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केले.