कोल्हापूर:शिरोळ तालुक्यातील युवकांनी सिनेक्षेत्रात उपजत गुण सिद्ध करून दाखवले आहेत.यापैकी हेरवाड गावचे सुपुत्र मोहसीन जमादार यांनी राष्ट्रीय स्तरावरील “पुष्पा २” या सुपरहिट चित्रपटाच्या संगणकीय एडिटिंगमध्ये योगदान देऊन संपूर्ण देशभर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.यावेळी मोहसीन यांचा विशेष सत्कार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या “पुष्पा २” चित्रपटाच्या यशात मोहसीन जमादार यांचे संगणकीय कौशल्य महत्त्वाचे ठरले आहे.ग्रामीण भागातून आलेल्या मोहसीन यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चित्रपटाची एडिटिंग व संगणकीय दृश्ये प्रभावीपणे साकारली.त्यांच्या या कौशल्यपूर्ण कामगिरीने सिनेक्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत.
मोहसीन यांच्या कार्याची प्रशंसा करताना ग्रामीण भागातील युवकांमध्ये सर्जनशीलता व उपजत गुण असल्याचे सांगितले. “शिरोळ तालुक्यातील युवकांना संधी मिळाली तर ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्तुंग कामगिरी करू शकतात.यापुढे सिनेसृष्टीत शिरोळ तालुक्यातील तरुणांना अधिकाधिक संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले.
मोहसीन जमादार केवळ सिनेसृष्टीत उत्कृष्ट योगदान देत नाहीत तर ग्रामीण भागातील युवकांना तंत्रज्ञान क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.त्यांच्याकडून अनेक युवकांना प्रशिक्षण मिळाले असून त्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
यड्रावकरांनी यावेळी मोहसीन यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जमादार यांचे सहकारी महेश मगदूम यांच्यासह त्यांची टीम उपस्थित होते .